संपूर्ण दारूबंदीचा दिल्लीत प्रथम प्रयोग
नवी दिल्ली, 11 – पंतप्रधान मोरारजी यांनी सांगितले की, देशात संपूर्ण दारूबंदी करावयाची आहे. परंतु प्रथम दिल्ली राजधानीत संपूर्ण दारूबंदीचा प्रयोग करण्यात येईल. दिल्ली प्रशासनाशी याबाबत वाटाघाटी चालू आहे. दारूबंदीबाबत लोकमत तयार करण्याच्या कामी लोकांनी सरकारशी सहकार्य करावे. सबंध देशात येत्या 4 वर्षांत संपूर्ण दारूबंदी अंमलात येईल, असे मुख्य मंत्रिपरिषदेत ठरले आहे.
चुनखडीपासून कापड निर्मिती शक्य?
नवी दिल्ली – येत्या काही वर्षांत चुनखडीपासून कापड तयार होईल. काश्मीरमध्ये चुनखडीचे साठे मोठ्या प्रमाणावर सापडत असून त्यापासून ऍक्रिलिक तयार होऊ शकेल. कृत्रिम सुताचा धागा तयार करण्यात ऍक्रिलिक हा महत्त्वाचा घटक असतो. प्लॅस्टिकच्या उद्योगधंद्यासही त्याची मदत होऊ शकेल. जपान व अमेरिका येथे चुनखडीपासून असे धागे तयार करण्यात येतात.