पुणे – करोना काळात गणेश विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने फिरते विसर्जन हौद उपलब्ध करून दिले होते. मात्र, करोनाची साथ संपलेली आहे. तसेच महापालिकेने यंदा टाक्यांची संख्या दुपटीने वाढवलेली आहे. गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर आला असतानाच महापालिकेने यंदा पुन्हा 150 फिरते विसर्जन हौद घेण्यासाठी निविदा काढली आहे.
यावर्षी महापालिका फिरते हौद घेणार नसल्याचे प्रशासनाच्या पातळीवर अगदी मागील आठवड्यापर्यंत वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, अचानक हा निर्णय बदलण्यात आल्याने कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरात विसर्जित केल्या जाणाऱ्या एकूण मूर्तींपैकी अवघ्या 10 टक्के गणेशमूर्ती या हौदांमध्ये विसर्जित केल्या जातात. तरीही प्रशासन या हौदांसाठी अट्टहास करत असल्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत.
त्यासाठी घनकचरा निर्मूलन विभागाने आज काढलेल्या निविदेमध्ये झोन एक, तीन आणि चारसाठी व झोन दोन व पाचसाठी अशा दोन पॅकेजमध्ये निविदा मागवल्या आहेत. प्रत्येक झोनमध्ये 30, असे 150 फिरते हौद असतील. यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. या निर्णयाबद्दल प्रशासनाने फेरविचार करण्याची मागणी होत आहे.
मागील वर्षी बहुतांशी मूर्तींचे विसर्जन फिरत्या हौदांमध्ये झाले. घरापर्यंत ही सेवा मिळते. त्यामुळे लोक रस्त्यावर कमी येतील. भविष्यात फिरत्या हौदांच्या संकल्पनेला लोकप्रियता मिळेल. – विक्रम कुमार, मनपा आयुक्त
करोनामुळे फिरते हौद संकल्पना आली होती. मात्र, 2022 मध्ये त्याची गरज नव्हती. तरीही दीड कोटी रुपये खर्च केले. त्यावर्षी 4 लाख 31 हजार गणपती विसर्जन झाले. त्यापैकी केवळ 50 हजार गणपती फिरत्या हौदात विसर्जन झाले आहे. एका गणपतीच्या विसर्जनासाठी 300 रुपये खर्च आला. मागील वर्षी पुन्हा तोच प्रकार घडला आहे. कारण नसताना यंदा फिरत्या हौदांसाठी पुन्हा निविदा काढली आहे. या निर्णयाबद्दल पालिका प्रशासनाने फेरविचार करणे आवश्यक आहे. – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच