तैपेई – तैवानच्या दक्षिणेकडील भागातल्या एका इमारतीला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत किमान 46 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीमध्ये किमान 41 जण जखमी झाले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या 13 मजली इमारतीला रात्री साडे 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली, असे कावसिंग शहराच्या अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीमध्ये इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले.
मृतांपैकी 11 जणांचे मृतदेह ओळखण्यापलिकडे जळून गेले आहेत. आतापर्यंत 55 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. मृतांचा नेमका आकडा केवळ रुग्णालयाचा अधिकृत घोषणेनंतरच निश्चित समजला जाऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र इमारतीच्या ज्या मजल्यावर सर्वाधिक गोंधळ होता, तेथेच आग सर्वात जास्त भडकलेली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीच्या सुरुवातीला स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे काही साक्षीदारांनी सांगितले.