पुणे, दि. 11 -पुणे शहरात दहा महिन्यांत एकुण 454 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, संशयित रुग्णांची संख्या चार हजारांवर पोचली आहे. यापैकी 121 हे सर्वाधिक रुग्ण एका सप्टेंबर महिन्यात आढळले आहेत. तर, डेंग्यू डासांची उत्पत्ती झाल्याप्रकरणी आतापर्यंत दोन हजार 763 जणांना नोटीसा बजावल्या आहेत.
डेंग्यू रुग्णांची संख्या शहरात वाढल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तीव्र ताप आल्याने तपासणी केल्यानंतर डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून येत आहे. तसेच काही रुग्णांच्या प्लेटलेट कमी होत असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. डेंग्यू हा विषाणूबाधित एडिस एजिप्टाय डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून, या तापाचा प्रसार मानवापासून डास आणि डासांपासून पुन्हा मानव असा असतो. या डासांची उत्पत्ती घरातील आणि परिसरातील भांडी, टाक्या आणि टाकाऊ वस्तू यात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणूबाधित डासाने चावा घेतल्यानंतर लक्षणे पाच ते सहा दिवसांनी दिसून येतात. मात्र हा काळ तीन ते 10 दिवसांपर्यंतचा असू शकतो.
ही आहेत डेंग्यूची लक्षणे…
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. यामध्ये अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी आणि डोळयांच्या मागे दुखणे ही लक्षणे आहेत. तर, रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते आणि त्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे आणि पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसात याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात आणि क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात.