शिरूर -शहरातील करोना रुग्ण आढळलेला कंटेनमेंट झोनमध्ये शिरूर नगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रीतम प्रकाश व महादेवनगर, अण्णापूर येथील रुग्णांच्या संपर्कात आलेले एकूण 44 जणांचे नमुने करोना तपासणीकरिता घेतले असून ते पुणे एन आय व्ही लाकडे तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे व शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
शिरूरमध्ये दोन करोना रुग्ण आढळले असून, एक रुग्ण शिरूरजवळील अण्णापूर गावांमध्ये आढळला आहे. यातील प्रीतम प्रकाशनगर, महादेवनगर येथील मुंबईवरून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील, वृद्ध महिला व अण्णापुर येथील 52 वर्षीय पुरुषावर शिरूर येथील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटल येथे उपचार झाले होते. तर एकाचा येथील एका डायग्नोस्टिक सेंटर मध्ये एक्स-रे काढण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही खासगी हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटरमधील डॉक्टर व इतर असे एकूण 44 जणांचे करोना तपासणीकरिता नमुने आज घेण्यात आले.
त्यात शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने 29 जणांचे एनआयव्हीकडे तर खासगी हॉस्पिटलमधील 15 जणांचे खासगी लॅबकडे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल मंगळवारी (दि. 2) संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता असून यामुळे शिरूरकरांची धाकधूक उद्या संध्याकाळपर्यंत राहणार आहे. यातील हॉस्पिटल कामगार, संपर्कात आलेले नागरिक नातेवाईक हे शिरूर येथील शहरांमधील रहिवासी आहे.
शिरूर नगरपालिकेच्या वतीने कंटेन्मेंट झोनमधील सर्व नागरिकांची माहिती, त्यांच्या घरी कोणी बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची, नातेवाईक माहिती, कोणाला रक्तदाब दमा मधुमेह असल्याची माहिती, गरोदर महिलांची माहिती, कोणी आजारी असेल तर त्याची माहिती. हे सर्व सर्वेक्षण सुरू आहे. या भागात जंतुनाशक यांची फवारणी करण्यात आली आहे.