नवी दिल्ली – बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री उशिरा एका सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान 43 लोक ठार झाले आणि डझनभर जखमी झाले, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. बांगलादेशचे आरोग्य मंत्री सामंत लाल सेन यांनी ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि लगतच्या बर्न हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर एएफपीला सांगितले की, आगीत आतापर्यंत 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मुख्य बर्न हॉस्पिटलमध्ये किमान 40 जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अग्निशमन विभागाने सांगितले की, गुरुवारी रात्री ९.५० वाजता ढाक्याच्या बेली रोड येथील लोकप्रिय बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये आग लागली आणि त्वरीत वरच्या मजल्यावर पसरली आणि अनेक लोक अडकले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली. यामध्ये ७५ जणांना वाचवले, असे अग्निशमन सेवेच्या निवेदनात म्हटले आहे. बेली रोड बिल्डिंगमध्ये मुख्यतः रेस्टॉरंट्ससह अनेक कपड्यांची आणि मोबाईल फोनची दुकाने आहेत.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्ही सहाव्या मजल्यावर होतो, जेव्हा आम्ही जिनावरून धुराचे लोट उठताना पाहिले. बरेच लोक वरच्या मजल्यावर धावले. आम्ही इमारतीच्या खाली जाण्यासाठी पाण्याच्या पाईपचा वापर केला. आमच्यापैकी काही जणांनी वरच्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झाले. इतर लोक छतावर अडकले आणि त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या.