नगर – दूध भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना प्रोत्साहनपर प्रति लिटर 3 रुपये प्रमाणे देण्यात येणारे अनुदानाची तब्बल 43 कोटी रक्कम थकली असून गेल्या 11 महिन्यांपासून जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. येथील शासकीय दूध संघाच्यावतीने त्याचा पाठपुरावा करण्यात येत असून संबंधित दूध संघांची माहिती शासनाला दिली आहे.
दरम्यान, शासनाकडून दूध उत्पादकांना मिळणाऱ्या अनुदानामुळे दूध संकलनात झालेली वाढ मात्र आता घटली आहे. एप्रिल 2019 मध्ये 26 लाख 48 हजार लिटर दुधाचे संकलन होते. ते आता जानेवारीमध्ये 24 लाख 52 लाख लिटर संकलन होत आहे. सुमारे 1 लाख 95 हजार लिटर दूध संकलनात घट झाली आहे. अर्थात नगर जिल्ह्यात सरासरी दूध संकलनापेक्षा जानेवारी महिन्यात 1 लाख 40 हजाराने वाढ झाली आहे.
राज्यातील दूध भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय तत्कालिन भाजप सरकारने घेतला होता. ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत पाच रुपयाने अनुदान देण्यात आल्यानंतर पुढे फेब्रुवारी ते एप्रिल 2019 या तीन महिन्यांसाठी अनुदान देण्यात आले. पण ते अनुदान 3 रुपयाने देण्यात आले. उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2/8.3 (गाय दूध) आणि त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दुधासाठी अनुदान देण्याचे जाहीर केले होते.
दुष्काळात शेतकऱ्यांना दूध उत्पादनापासून आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न झाला. भाजप सरकारने पाच रुपये प्रमाणे अनुदान जमा केले पण 3 रुपये प्रमाणे देण्यात येणार अनुदान मात्र गेल्या 11 महिन्यात जमा झाले नाहीत. या फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात 22 कोटी 12 लाख 78 हजार 637 लिटर दूध संकलन झाले असून त्यापैकी 14 कोटी 25 लाख 88 हजार 409 लिटर दूध अनुदानास पात्र ठरले आहे. त्यानुसार 42 कोटी 77 लाख 65 हजार 227 रुपये अनुदान उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु गेल्या 11 महिन्यांपासून ही अनुदान रखडले आहे.
एप्रिल 2019 पासून दूधाला देण्यात येणारे अनुदान बंद झाल्याने त्यांचा परिणाम दूध संकलनावर झाला असून जिल्ह्यात दूध संकलनात घट झाली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये 25 लाख 24 हजार, मार्च महिन्यात 25 लाख 85 हजार तर एप्रिल महिन्यात दूध संकलन हे 26 लाख 48 हजार लिटरवर गेले होते.
पण अनुदान बंद झाल्यानंतर खासगी व सहकारी दूध संघामध्ये होणाऱ्या दूध संकलनात मोठी घट झाली आहे. एप्रिल 2018 मध्ये 23 लाख 43 हजार लिटर संकलन होते. त्या तुलनेत एप्रिल 19 मध्ये तब्बल 3 लाख 5 हजार लिटरने वाढ झाली होती. नोव्हेंबर 19 मध्ये 25 लाख 36 हजार लिटर तर डिसेंबरमध्ये 25 लाख 35 हजार लिटर दूध संकलन झाले. जानेवारी 2020 मध्ये यात आणखी घट झाली असून 24 लाख 52 हजार लिटर संकलन झाले आहे.