कर्तव्यात कसूर; प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांची कारवाई
नगर – कर्जत येथील उपकारागृहातून एकाच वेळी पाचआरोपींनी पलायन केल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी घडली होती. यावेळी कारागृहाच्या रक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर प्रकरणी चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी निलंबित केली आहे.
पोलीस नाईक रावसाहेब, दशरथ नागरगोजे, जालिंदर काशिनाथ माळशिकारे, दीपक शिवमुर्ती कोल्हे, देविदास सोपान पळसे यांचा समावेश आहे. कर्जत उपकारागृहातून एकाच वेळी पाच आरोपी पळून जाणारी ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सात पथके रवाना केली होती.
त्यात स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना तर कर्जत पोलिसांनी एका आरोपीस वडगाव मावळ व इंदापूर परिसरात (जि. पुणे) पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. कर्जत येथील उपकारागृहाच्या कोठडी क्रमांक 4 मधून ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा, ता. जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव, ता. जामखेड), अक्षय रामदास राऊत (रा. पारेवाडी, ता. जामखेड), चंद्रकांत महादेव राऊत (रा. पारेवाडी. ता. जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप (रा.म्हाळंगी, ता. कर्जत) या पाच कुख्यात आरोपींनी रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पलायन केले होते.
कर्जत उपकारागृह खूप वर्ष जूने आहे. यापूर्वी किरकोळ काम वगळता या कारागृहाचे मोठे काम करण्यात आलेले नाही. आरोपींनी पलायन करण्यासाठी सुट्टीचा दिवस निवडला. तशी तयारी त्यांनी पूर्व नियोजित केली असावी. पळून जाण्यासाठी कटरच्या सहाय्याने गज कापून अवघ्या काही मिनीटात पलायन केले.
गज कापन्यासाठी आरोपींना कटर कसे उपलब्ध झाले. हा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होतो. उपकारागृहात आरोपीच्या रक्षणासाठी चार पोलीस कर्मचारी तैनात होत. तर मग पाच आरोपी पळून जात असताना एकाही कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला नसावा का? असा प्रश्न उपस्थित करून कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक पाटील यांनी चार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले.
आरोपींना कटर दिले कुणी
उपकारागृहात चार बराकी आहे. यामध्ये 27 आरोपींची क्षमता असली तरी प्रत्यक्षात 27 पेक्षा जास्त आरोपी येथे आहेत. ज्या बराकीतून आरोपी पळाले त्या बराकीमध्ये एकूण सहा आरोपी होते. बराकीच्या एका कोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. आरोपींना गज कापण्यासाठी बाहेरून कोणी कटर पुरविले? त्यावेळी बंदोबस्तात असलेले पोलीस कर्मचारी काय करत होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.