नवनाथ बल्लाळ यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त : इच्छुकांची मांदियाळी
नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या निवडी
बारामती (प्रतिनिधी) – बारामती नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी सोमवारी (दि. 17) राजीनामा सादर केला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी असून आतापासूनच त्यांनी “फिल्डिंग’ लावण्यास प्रारंभ केला आहे.
बल्लाळ यांनी राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सूचनेनुसार पुढील उपनगराध्यक्षपदी दिले जाणार असून अजित पवार उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक सत्यव्रत काळे, सुरज सातव, जयसिंग देशमुख, बाळासाहेब जाधव, अतुल बालगुडे यांच्या नावाची चर्चा आहे.
बारामती नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडी सोमवारी नगरपरिषदेत पार पडल्या. या निवडी पार पडण्याआधी बल्लाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्याकडे सुपूर्त केला. दम्यान, बांधकाम सभापतिपदी संतोष बाळकृष्ण जगताप, आरोग्य सभापतिपदी कुंदन किशोर लालबिगे, क्रीडा व शिक्षण सभापतिपदी शीतल गणेश गायकवाड, महिला व बालकल्याण सभापतिपदी डॉ. सुहासिनी सचिन सातव तर महिला व शिक्षण समितीच्या उपसभापतीपदी अनिता विनोद माने यांची निवड करण्यात आली. तर पाणीपुरवठा सभापतिपदी सविता सुजित जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विजय पाटील यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर उपस्थित होते.
आगामी काळात महिला बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच महिलांना प्रशिक्षित करणे यासाठी प्रयत्न केले जातील. नगरपरिषदेच्या शाळेच्या दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी वेगवेगळ्या शिक्षण पद्धतींचा अवलंब केला जाईल. तसेच यासाठी आवश्यक असणारे निधीची तरतूद करण्यात येईल. विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढावी यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातील. तसेच अपंगांच्या बाबतीत देखील योग्य ती काळजी घेतली जाईल.
– डॉ. सुहासिनी सचिन सातव,
नवनिर्वाचित सभापती, महिला बालकल्याण