- बाधितांचा आकडा घसरला
- 2812 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – अनेक दिवसांनंतर दैनंदिन करोना रुग्णवाढीचा आकडा दोन हजाराच्या खाली आल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी करोना बळींची संख्या तब्बल 41 झाल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात शहरात 1841 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 2812 जणांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे आकडे दिलासा देणारे असले तरी मृत्यू मात्र तब्बल 41 नोंदविण्यात आले आहेत.
मंगळवारी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार करोनामुळे शहरातील 25 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 16 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढताच पालिका प्रशासनाने रोजप्रमाणे हे जुने मृत्यू असल्याचे सांगून टाकले आहे. या मृत्युंमुळे आतापर्यंत शहरातील 2223 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणारे 914 अशा एकूण 3137 रुग्णांचा करोनामुळे उपचारा दरम्यान मृत्यू झाले आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये शहरातील 1838 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत शहरातील एक लाख 71 हजार 802 जणांना करोनाची लागण झाली आहे. दिवसभरात 2812 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या एक लाख 45 हजार 276 इतकी झाली आहे. शहरात सध्या 24303 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून त्यापैकी 5575 रुग्ण रुग्णालयात दाखल असून उर्वरित 18728 रुग्ण हे घरी राहून उपचार घेत आहेत. उद्योजक, कामगार आणि व्यावसायिकांना करोना चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आल्याने चाचण्यांची संख्या वाढली आहे. दिवसभरात तब्बल 10 हजार 265 जणांच्या करोना चाचण्या झाल्या असून 4213 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
करोनामुळे वृद्ध आणि इतर आजार असलेल्या रुग्णांचाच मृत्यू होतो, असा समज आहे. परंतु मंगळवारी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार करोनाने तरुण आणि मध्यमवयीन नागरिकांना देखील मृत्यूच्या दाढेत ढकलले आहे. 41 मृत्यूंपैकी 7 मृत्यू 30 ते 40 वयोगटातील आहेत. तर 6 मृत्यू हे 40 ते 50 वयोगटातील रुग्णांचे झाले आहेत.
जिल्हा रुग्णालयात 23 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि. 13) 23 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 4 रुग्ण बरे होऊन घरी परतले. करोनाबाधित रुग्ण हे बालेवाडी, खडकी, सांगवी, पुणे, औंध, गोखलेनगर, थेरगाव, चाकण, लोणी काळभोर, वडगाव शेरी, औंध आदी परिसरातील आहेत. नवी सांगवी, धनकवडी, औंध येथील हे 4 रुग्ण करोनापासून मुक्त झाले आहेत. हे रुग्ण 35 ते 45 वयोगटातील आहेत. उपचारादरम्यान दोन पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या 86 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 48 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत एकूण 1 हजार 55 रुग्ण बरे झाले आहेत. 1 हजार 480 रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले आहे.