Pune | लाॅकडाऊनच्या भितीने परप्रांतीय परतीच्या वाटेवर; पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी

पुणे – राज्यातील करोना बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असल्याने लॉकडाऊनच्या शक्‍यतादेखील व्यक्‍त करण्यात येत आहेत. त्यामुळे आता पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांची गर्दी वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लागल्यास मूळगावी परतता येईल का, या शक्‍यतेने नागरिक धास्तावले आहे.

देशाच्या विविध भागांतून अनेक कामगार आणि त्यांचे कुटुंबिय कामासाठी स्थलांतर करतात. पण शहरातील दुकाने, आस्थापनांसह रोजगाराच्या संधीवर बंधने आहेत. अनेकांचे रोजगाराचे मार्ग बंद झाले आहेत. याशिवाय, मागील काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लागू होईल, अशी भीतीदेखील वाढत आहे.

मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरितांची मोठी गैरसोय झाली होती. तशी गैरसोय पुन्हा होऊ नये, म्हणून नागरिकांनी गाव गाठण्यास सुरुवात केली. सध्या पुणे-हावडा, पुणे-दरभंगा, पुणे-गोरखपूर, पुणे-लखनौ या गाड्यांना मागील काही दिवसांपासून अधिक गर्दी आहे.

मागील वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेकांची घरी जाण्याची आबाळ झाली होती. अनेकांनी पायी घरचा रस्ता धरला होता. तर अनेक नागरिक रेल्वेच्या श्रमिक विशेष गाड्यांनी घरी परतले होते. त्यामुळे यंदा खबरदारी म्हणून लॉकडाऊनपूर्वीच नागरिक घराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मागील काही दिवस तुलनेने कमी प्रवासी संख्या असणारे रेल्वे स्थानक पुन्हा नागरिकांनी गजबजले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.