सातारा -जिल्हा परिषदेने देशभरात नावलौकिक मिळवला असून आता एका अभिनव उपक्रमामुळे जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविलेल्या जिल्हा परिषदेतील एकूण 40 विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्त्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेसन) या भारताला अंतराळ संशोधनात जगभरात पोचविणाऱ्या संस्थेतील अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसेदिवस उंचावत असून राज्य शासन राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे शाळांचा नावलौकिक वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त व डिजिटल पध्दतीने शिकविले जात आहे. या नवनवीन उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात विविध क्षेत्रात नाव कमविले आहे.
नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या जगभरातील विविध देशांशी भारताला स्पर्धा करता येईल आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधांचे जाळे संपूर्ण भारतभर पसरवणे शक्य झाले त्या तंत्रज्ञानाद्वारे भारत विकसित देशाच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या इस्रो या संस्थेला जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना भेट मिळणार आहे. अंतराळातील अत्याधुनिक उपग्रहांविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांना पुढील काळात निश्चितपणे फायदा होणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकही जाणार आहेत. चार दिवस इस्त्रोच्या विविध विभागांना भेटी देऊन नाविन्यपूर्ण माहिती गोळा केली जाणार आहे. या उपक्रमाला जिल्हा परिषदेच्यावतीने अंतिम स्वरुप दिले जात आहे.
जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न झाल्याने आज जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा चमकत आहेत. शिष्यवृत्तीचा सातारा जिल्हा पॅटर्न म्हणून आता ओळख होऊ लागली आहे. शालेय स्तरावर असतानाच विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील र्स्त्रो संस्थेला भेट देण्याची संधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
– विनय गौडा(मुख्य कार्यकारी अधिकारी)