अयोध्या – अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराचे काम 40 टक्के पुर्ण झाले आहे अशी माहिती या कामाची उभारणी करणाऱ्या ट्रस्टने दिली आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, डिसेंबर 23 पासून नागरीक या मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतील. ते म्हणाले की मंदिराच्या उभारणीबरोबरच मंदिराच्या परिसरातील रस्ते आणि सुविधांच्या विकासाचे काम वेगात सुरू आहे.
चंपत राय हे कारसेवक पुरम मध्येच वास्तव्याला असून ते मंदिराच्या संबंधात रोज संबंधीतांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेत असतात. या मंदिराला निधी कोठून येतो असे विचारता ते म्हणाले की, देवाच्या कामात पैशाची कमतरता ती काय? भगवंताच्या पायाशी लक्ष्मीच बसलेली असते.
ट्रस्टच्या इतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर हजारो वर्ष टिकावे यासाठी त्याची बांधकाम रचना करण्यात आली असून या मंदिर संकुलाचा पायाच अत्यंत विस्तृत आणि भक्कम स्वरूपाचा उभारण्यात येत आहे. एकूण आठ एकराच्या जागेवर हे मंदिर उभारले जात आहे. मंदिराच्या गर्भगृहासाठी राजस्थानातील मकराना येथून पांढरा संगमरवरी दगड आणण्यात आला आहे.
मंदिराचे गर्भगृह 95 हजार 300 चौरस फुटाचे असेल. सुप्रिम कोर्टाने 9 नोव्हंबर 2019 रोजी दिलेल्या निकालामुळे मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या कामाचे भूमीपुजन झाले. (40 percent work of Ram temple in Ayodhya is complete, construction is going on for two years)