पुणे – महसूल व्यवस्थापन आणि राज्य तसेच केंद्रशासनाच्या योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यशासनाकडून पुणे महापालिकेस गौरविण्यात आले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षातील उल्लेखनिय प्रशासकीय कामकाजासाठी पुणे महापालिका राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
नगरविकास दिनानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यात प्रशासकीय कामकाजात नाशिक महापालिकेस पहिला तर ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे.
राज्यशासनाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे मूल्यमापण करण्यासाठी ही स्पर्धा घेतली होती. त्यात, राज्यातील अ व ब वर्ग महापालिकांचा एकत्र गट करण्यात आला होता. या स्पर्धेसाठी केआरए निश्चित करण्यात आला होता. त्यात, मिळकतकराची वसूली, महसूली व जमा खर्च, अस्थापना खर्चाचे प्रमाण, वित्तीय व्यवस्थापन, भांडवली कामे याबाबत माहिती मागविण्यात आली होती. त्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थाचे मुल्यमापन करून हे निवड करण्यात आली.
या शिवाय, महापालिकेने केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत मिशन, अमृत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना यासाठी केलेल्या कामांची दखल या मुल्यांकनात घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, राज्याचे मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी हे उपस्थित होते. तर, महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त आशा राऊत, महेश डोईफोडे यावेळी उपस्थित होते.