लष्कराच्या प्रत्युत्तरात 80 जिहादीही गारद
क्वागादौगौ – पश्चिम अफ्रिकेतील बुर्किना फासो मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 35 जण ठार झाल्याचे वृत्त असून ठार झालेल्यांमध्ये बहुतेक महिला आहेत. जिहादींनी नागरी वस्तीवरील या हल्ल्यासह तेथील लष्करी तळावरही हल्ला केला.तेथे झालेल्या धुमश्चक्रीत सात जवान आणि 80 जिहादी ठार झाले आहेत. हा देश माली आणि नायगरच्या सीमेला लागून आहे. तेथे वारंवार असे दहशतवादी हल्ले होत असतात पण यावेळी त्यांनी संघटीतपणे दोन हल्ले घडवून आणले त्यात दोन्ही बाजुंची मोठी जीवित हानी झाली आहे.
या घटनेच्या संबंधात लष्करी सुत्रांनी सांगितले की जिहादी दहशतवाद्यांनी अरबिंदा भागात एकाच वेळी लष्करी तळ आणि नागरी वस्तीवर हल्ले चढवले. नागरी वस्तीवरील त्यांच्या हल्ल्यात 35 जण ठार झाले. त्यात 31 महिला आहेत. तर दुसरीकडे त्यांनी लष्करी तळावरही हल्ला चढवला. मात्र त्याला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले त्यात 80 जिहादी गारद झाले आहेत.
या नागरी हत्यांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी देशात 48 तासांचा दुखवटा जाहीर केला आहे. हे जिहादी मोठ्या प्रमाणावरील दुचाकी गाड्यांवर आले होते. लष्करी तळाला त्यांनी चारही बाजूने घेरून अंदाधुद गोळीबार केला. पण लष्करानेही तितक्याच ताकदीने त्यांना प्रत्युत्तर दिल्याने बहुतेक सारे हल्लेखोर ठार झाले.