नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वे च्या कामात झालेल्या घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी केली जात असून या प्रकरणात माजी सीईओ पी.सी. गुप्ता यांच्यासह एकूण 20 जणांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या कामात 126 कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय असून याची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश उत्तरप्रदेश सरकारने दिला आहे. त्यानुसार सीबीआयने याची चौकशी सुरू करून ही कारवाई केली आहे.
या प्रकल्पासाठी मथुरा जिल्ह्यातल्या सात गावांमधील जमीन खरेदी करण्यात आली होती. युमना एक्स्प्रेस वे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऍथॉरिटीने ही जमीन 85 कोटी रूपयांना खरेदी केली त्यामुळे सरकारचे 126 कोटींचे नुकसान झाले असा आरोप केला जात आहे. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.