पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेची हद्दवाढ करत २०१७ पासून दोन टप्प्यांत ३४ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या वर्षापासून हे गावकरी महापालिकेचा मिळकतकर अधिक असल्याचे घसा ओरडून सांगत आहेत. त्यानंतर हा आवाज आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाच्या कानावर पडला आहे.
या गावांमधील मिळकतकर थकबाकीचा आकडा तब्बल १,२४५ कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे ही कर वसुली थांबवावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्याचा मोठा फटका महापालिकेला बसणार आहे. महापालिकेने या गावांचा समावेश झाल्यानंतर त्यांना महापालिकेच्या नियमानुसार कर आकारणी केली. त्याला सुरूवातीपासूनच सर्व ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात विरोध केला. आंदोलने केली, शासनाकडे निवेदनही दिली.
मात्र, कोणीही फारसा प्रतिसाद दिला नाही. मागील वर्षी कर आकारणी, सुविधांबाबत उरुळी-देवाची आणि फुरसुंगीच्या नागरिकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. तर मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही गावांची नगरपालिका करण्याची घोषणा केली. मात्र, तो निर्णय झालेला नाही.
आता ही गावे बहुतांश गावे बारामती लोकसभा मतदारसंघात आहेत. तर, राज्यातही सत्ता समीकरणे बदलेली असून बारामतीत तर थेट पवार विरोधात पवार लढत होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत ही गावे महत्वाची भूमिका बजाविणार असल्याने निवडणुकांच्या तोंडावर शासनाला जाग आली असल्याची टीकाही होत आहे.
महापालिकेला फटका ?
३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिकेची हद्द राज्यात सर्वांत मोठी ५२८ चौरस किलोमीटर आहे. अशा स्थितीत दोन्ही वेळेस गावे घेताना पालिकेने ११ गावांसाठी २,००० कोटी रु. आणि २३ गावांसाठी ४,५०० कोटींच्या अनुदानाची मागणी शासनाकडे केली होती. मात्र, शासनाने दमडीही दिली नाही. त्याचा फटका या गावांना बसला.
महापालिकेस उपलब्ध निधीतूनच गावांना विकासकामे करावी लागली. तर निवडणुका नसल्याने गावांना लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे कर आकारणीत गावांचे आणि महापालिकेचेही नुकसान न होता तोडगा निघाला नाही, तर महापालिकेस फटका बसणार आहे. पुन्हा तो अप्रत्यक्षपणे गावांच्या विकासकामांवर परिणाम करणारा आहे.
अशी आहे सद्यस्थिती
सन २०१७ : महापालिकेत ११ गावांचा समावेश
सन २०२१ : आणखी २३ गावांचा समावेश
४ लाख २५ हजार ५८७
समाविष्ट गावांतील एकूण मिळकती
३ लाख ७४ हजार
मनपाने कर आकारणी केलेल्या मिळकती
अकरा गावांची स्थिती
२ हजार ४९ कोटी रु. : एकूण कर आकारणी
१ हजार ६४ कोटी रु. : आतापर्यंत भरलेला कर
९८५ कोटी रु. : एकूण थकबाकी
तेवीस गावांची स्थिती
३५६ कोटी रु. : एकूण कर आकारणी
९६ कोटी रु. : आतापर्यंत भरलेला कर
२६१ कोटी रु. : पहिल्या वर्षी थकबाकी