मेडेलिन सिटी (कोलंबिया) – दक्षिण अमेरिकन देश कोलंबियामध्ये भूस्खलनामुळे ३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कुडिबो आणि मेडेलिन शहरांना जोडणाऱ्या व्यस्त रस्त्यावर दरड कोसळल्याने कोलंबियाच्या डोंगराळ प्रदेशात भूस्खलन झाले.
ही घटना शुक्रवारी घडली. कोलंबियाच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापनाने सुरुवातीला १८ लोकांच्या मृत्यूची माहिती देणारे निवेदन जारी केले होते, परंतु प्रत्यक्षात मृतांची संख्या ३४ आहे.
या जीवघेण्या भूस्खलनात अनेक जण जखमीही झाले आहेत. मृतांपैकी १७ मृतदेहांची ओळख पटली असून १७ जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. कोलंबियाचे उपाध्यक्ष फ्रान्सिया मार्केझ यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, दुर्घटनेच्या ठिकाणी तपास मोहीम सुरू आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे, मात्र त्यांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही.
भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु त्या ठिकाणी नुकताच मुसळधार पाऊस झाल्यामुळे दरड कोसळली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तेथे अजूनही पाऊस सुरू आहे, त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर वाहनांचा ताफा उपस्थित होता, मात्र अचानक संपूर्ण डोंगर कोसळल्याचे दिसत आहे. अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबली गेली आणि मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागला.