नवी दिल्ली – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे.
लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा यांनाही अभिषेक समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे, असेही विश्व हिंदु परिषदेने म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल यांनी बाबू जगजीवन राम यांच्या कन्या मीरा कुमार यांना निमंत्रण दिले आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेच्या प्रवक्त्याने दिली. तथापि या निमंत्रणाबाबत मीराकुमार यांनी मात्र अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही.
कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांना आलेले निमंत्रण या आधीच नाकारल्याने मीराकुमार याही हे निमंत्रण स्वीकारण्याची शक्यता नाही, असे सांगितले जात आहे.