- महाराष्ट्र आणि गुजरात मधून सहा जणांना अटक
पिंपरी – बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात कारवाई करत 32 लाख 67 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ओटास्कीम निगडी येथून सुरू झालेली कारवाई पंढरपूर, सातारा, मुंबई मार्गे गुजरात पर्यंत गेली. महाराष्ट्रातून तीन तर गुजरात मधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
गोरख दत्तात्रय पवार (वय 30, रा. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विठ्ठल गजानन शेवाळे (वय 38, रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही (वय 36, रा. नालासोपारा पुर्व वसई पालघर), राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार (वय 38, रा. रानपुर काकरिया चौरा ता. रानपूर, जि. बोटाद, गुजरात), जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल (वय 26), किरण कुमार कांतीलाल पटेल (वय 38, दोघे रा. पालनपुर, ता. पालनपुर, जि. बनासकाठा गुजरात) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
निगडी मधील ओटास्कीम परिसरात एक व्यक्ती 23 जून रोजी नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोरख पवारला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून पाच लाख 86 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. गोरख पवारला या नोटा त्याचा सातारा जिल्ह्यातील मित्र विठ्ठल शेवाळे याने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी शेवाळेला पाटण तालुक्यातील ढेबेवाडीतून अटक केली. शेवाळेकडून तीन लाख 70 हजार 500 रुपयांच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
शेवाळे याने नालासोपारा येथील जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले. जितेंद्रला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जितेंद्र याला न्यायालयातून वर्ग करून घेतले. जितेंद्र याने त्याचा गुजरात येथील राजू परमार याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बनासकाठा जिल्ह्यातील पालनपुर येथून आरोपी राजू परमार याला अटक केली. त्याच्याकडून 15 लाख 93 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.
आरोपी परमारने बनावट नोटा जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार अटक केली. या दोघांकडून लॅपटॉप, कलर प्रिंटर जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णदेव खराडे, पोलीस निरीक्षक सायबर शाखा डॉ. संजय तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, उपनिरीक्षक आर बी बांबळे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर यांच्या पथकाने केली आहे.