इस्लामाबाद – न्यायाधीश महिलेला धमकावल्या प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबादेतील न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. त्यामुळे आता इम्रान खान यांना अटक केली जाण्याची चिन्हे आहेत.
इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबादचे 3 हजार पोलीस कर्मचारी इस्लामाबादचे उपनगर असलेल्या बानिंगला येथील खान यांच्या निवासस्थानी रवाना झाल्याचे समजते आहे. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमा व्हायला सुरुवात केल्यानंतर अटकेच्या शक्यतेची अफवा असल्याचे पोलिसांनी सांगून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिनांक 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादेत केलेल्या भाषणादरम्यान इम्रान खान यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संदर्भात खान यांच्याविरोधात पोलिसांकडे प्रकरण देखील दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार स्थानिक न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
इम्रान खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात दहशतवादाचे प्रकरण देखील दाखल केले गेले होते. मात्र इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हे आरोप मागे घेण्यात आले होते. दहशतवादाच्या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र तो आरोपच रद्द झाल्यामुळे स्वाभाविकपणे जामीनही रद्द झाला आहे.