बॅकॉंक – म्यानमारमध्ये एका जुन्या खाणीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये किमान 30 जण बेपत्ता झाले आहेत. या सर्वजणांच्या शोधाचे आणि बचावासाठीचे काम सुरू आहे, असे बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्यानमारच्या सर्वात मोठ्या शहर यंगूनच्या उत्तरेस 950 किलोमीटर अंतरावर असलेल्या काचिन राज्यातील हपाकांत या एका दुर्गम पर्वतीय शहरात ही घटना घडली. हे क्षेत्र जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात किफायतशीर जेड खाणींचे केंद्र आहे.
रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास मन्ना गावाजवळच्या खाणीमध्ये हे भूस्खलन झाले. खाणींमध्ये कार्यरत असलेले 30 खाण कामगार या भूस्खलनामध्ये गाडले गेले असल्याचे स्थानिक बचाव पथकाच्या धिकाऱ्यांनी सांगितले.
या गावाजवळील जमिनीचा मोठा भाग आणि माती खाणीमध्ये तब्बल 304 मीटर खोल तलावामध्ये धसला. त्यामुळे खाणीतील कामगारांचा बाहेर येण्याचा मार्ग बंद झाला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
एकूण 34 जण नक्की बेपत्ता झाले आहेत. या सर्वांचा तलावामध्ये शोध घेतला जात आहे. या भूस्खलनामुळे 8 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे.
म्यानमारच्या दुर्गम भागांमध्ये अशा औद्योगिक दुर्घटना अनेक वेळा घडत असतात. मात्र त्यांची फार कमी वेळा दखम घेतली जात असते. जुलै 2020 मध्ये याच भागात झालेल्या भूस्खलनात किमान 162 लोक मरण पावले होते, तर नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या अपघातात 113 लोकांचा मृत्यू झाला होता.