पुणे – कर्ज न फेडता सदनिकेची परस्पर विक्री करुन बँकेची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.नरावडे यांनी फेटाळला. रफीक मेहबूब शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह पत्नी तक्सीन, चेतन अशोक सत्यगिरी, जावेद इब्राहिम मणियार यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल आहे.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी जामिनास विरोध केला. तो सराईत आहे. कोंढवा, बंडगार्डन आणि वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठ गुन्हे दाखल आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. तो पुराव्यात छेडछाड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी पवार यांनी केली.
याबाबत दि मुस्लीम को. ऑप बँकेचे व्यवस्थापक शोएब आलम शाह मीर (वय ४०, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपी शेख याने बँकेकडून सदनिका खरेदीसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज काढले होते. त्याद्वारे कोंढव्यातील आयेशाबी अपार्टमेंटमध्ये दोन सदनिका खरेदी केल्या. त्याने सुरुवातीला हप्ते भरले. त्यानंतर हप्ते भरणे बंद केल्याने बँकेकडून त्याला नोटीस पाठवली. मात्र, त्याने कर्ज नसल्याचे सांगून सदनिकेची परस्पर विक्री केली.
बनावट कागदपत्रे तयार करुन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शेख यांच्यासह मध्यस्थ सत्यगिरी, मणियार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.