भिगवण (वार्ताहर) – डाळज क्रमांक 2 (ता. इंदापूर) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर फॉर्च्युनरची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी हे लातूर येथील एकाच कुटुंबातील आहेत. हा अपघात (दि. 8) रात्री बाराच्या सुमारास घडला.
गीता अरुण माने (वय 36), मुकुंद अरुण माने, अरुण बाबूराव माने (वय 45, तिघे रा. लातूर), असे अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत तर साक्षी अरुण माने (वय 18), महादेव रखमाजी नेटके (वय 56, रा.लातूर) हे जखमी झाले आहेत.
सोलापूर महामार्गावर डाळजजवळ उसाने दोन ट्रॉली भरलेला ट्रॅक्टर हा सोलापूरच्या दिशेने निघाला होता. डाळज नं.2 येथे त्याच दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्युनर गाडीने ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली.
या धडकेत जवळपास निम्म्या फॉर्च्युनर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने भिगवण व पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला. तसेच दोघांवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. रुपनवर करीत आहेत.