मुंबई – मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार असलेले अनिल गमरे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भीषण अपघातात त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईतील पामबीच येथे रविवारी पहाटे घडली. अक्षय गमरे (वय-28), संकेत गमरे (वय-24) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशीगाव येथे राहणारे पोलीस हवालदार अनिल गमरे यांचे मुलगे अक्षय आणि संकेत शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटून दुचाकीवरू घरी परतत होते. पामबीच रोड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या मर्जडिज कारने अक्षय आणि संकेत यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघात एवढा भीषण झाला की यात दुचाकीवरील दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच एपीएमसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. अपघातग्रस्त मर्सडीज कार ताब्यात घेऊन पोलिसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी नवी मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित हाॅटेल संचालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली. रोहन अॅबोर्ट असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी त्याला अटक केली. आरोपी रोहनला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामिनावर सोडले आहे.
अपघातात एकाचवेळी दोन मुलांना गमवावे लागल्यामुळे पोलीस हवालदार अनिल गमरे आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप गमरे कुटुंबीयांनी केला आहे.