माणगावमध्ये कारखान्यातील स्फोटात 3 ठार, 15 जखमी

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका येथील विळे भागात औद्योगिक वसाहतीत क्रिपझो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सिलिंडरचा स्फोट होऊन 3 जणांचा मृत्यू झाला असून
15 जण जखमी झाले. यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

उर्वरित जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
या कंपनीत ऑक्‍सिजनचे सिलिंडर तयार केले जातात. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीत आग लागली. यात कामगार भाजले गेल्याने 3 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य 15 जण जखमी झाले आहेत.

हा स्फोट नेमक्‍या कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरत गोगावले यांनी माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Leave A Reply

Your email address will not be published.