पवार आणि सोनियांची भेट लांबणीवर?

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार स्थापनेची प्रक्रिया अजून दृष्टीपथात नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्या (रविवार) दिल्लीत होणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संभाव्य भेटीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, ती भेट लांबणीवर पडण्याची शक्‍यता बळावली आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत नवी राजकीय समीकरणे उदयास येऊ घातली आहेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापनेसाठी नवी आघाडी बनवतील, अशी चिन्हे आहेत. त्या आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याच्या दृष्टीने पवार आणि सोनिया यांच्या भेटीचे महत्व वाढले होते. मात्र, पवार यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. ती बैठक सायंकाळी 4 वाजता सुरू होणार आहे. ती बैठक आटोपल्यानंतर पवार दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे त्यांची सोनियांशी भेट होणे अवघड असल्याचे मानले जात आहे.

आता दिल्लीत पोहचल्यानंतर पवार प्रथम कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतील. ती भेट सोमवारी किंवा मंगळवारी होईल. त्यानंतर पवार आणि सोनियांची भेट होईल, अशी शक्‍यता सुत्रांनी वर्तवली.

Leave A Reply

Your email address will not be published.