अबब! 17 महिन्यात 12 हजार भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली : जानेवारी 2018 ते मे 2019 या 17 महिन्यांच्या काळात तब्बल 12 हजार 223 भारतीयांचा परदेशांत मृत्यू झाला, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिली आहे. यामुळे दररोज सुमारे 23 ते 24 भारतीयांचे प्राणोत्क्रमण परदेशात होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार जतीन देसाई यांनी हा प्रस्न विचारला होता. भारतीयांचा परदेशी कारागृहात आणि परदेशी व्यक्तींचा भारतीय कारागृहात मृत्यू होण्याची माहिती त्यांनी प्रत्यक्षात विचारली होती. त्यावेळी या काळात परदेशात मरण पावणाऱ्या व्यक्तींची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संचालज अजुंगला यांनी पाठवली. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे कारागृहात मरण पावलेल्या भारतीयांची माहिती या खात्याकडे उपलब्ध नाही. तसेच भारतीय कारागृहात मरण पावलेल्या परदेशी व्यक्तींची माहितीही या खात्याने संकलीत केलेली नाही.

या मरण पावणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? पर्यटक होत्या की अनिवासी भारतीय होत्या? व्यावसायिक प्रवास करणाऱ्या होत्या? की अन्य वर्गातील होत्या याची माहिती नवा प्रस्ताव टाकून विचारणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची कारणे , अपघात आजारपण, परदेशात झालेले हल्ले या पैकी कोणते होते? त्यांचे अनैसर्गिक मृत्यू आलेल्यांचे मृतदेह परत पाठवताना नुकसानभरपाई दिली का? परदेशांत त्यांना वैद्यकीय सेवा मिळाल्या की नाही अशी माहिती विचारणार आहे. हा मुद्दा संसदेत विविध राजकीय पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित करावा, असे आवाहनही देसाई यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.