नवी दिल्ली – दिल्लीतील तीन महानगर पालिकांचे विलीनीकरण करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केले. दिल्ली महापालिका कायद्यात दुरुस्ती करून या तीन महापालिकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे.
दिल्ली महापालिकेचे तीन स्वतंत्र महापालिकांमध्ये विभाजन करण्याचे दुरुस्ती विधेयक 12 ऑक्टोबर 2011 रोजी मंजूर करण्यात आले होते. या विधेयकानुसार दिल्लीत दक्षिण दिल्ली महापालिका, उत्तर दिल्ली महापालिका आणि पूर्व दिल्ली महापालिका अस्तित्वात आली होती. आता या तिन्ही महापालिकांचे एका महापालिकेत विलीनीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान केंद्र सरकारने उपस्थित केलेल्या काही कायदेशीर बाबींची छाननी करण्यासाठी निवडणूक आयोगाला थोडा अवधी हवा आहे. त्यामुळे दिल्ली महापालिकांच्या निवडणूकीच्या तारखांची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त एस.के. श्रीवास्तव यांनी सांगितले.
तिन्ही महापालिकांची निर्मिती करताना एकसमान भौगोलिक रचनेच्या आधारावर केली गेलेली नव्हती. या तिन्ही महापालिकांच्या महसूली क्षमताही वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे तिन्ही महापालिकांच्या आर्थिक स्रोतांमध्ये खूप तफावत निर्माण झाली होती. ही तफावत दिवसेंदिवस खूपच वाढत गेली. त्यातून दिल्लीच्या विकासावर परिणाम व्हायला लागल्याने विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा लागला असल्याचेही निवडणूक आयुक्तांनी सांगितले.