अथेन्स – ग्रीसमधील कैथरा या बेटावर समुद्रामध्ये सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी बुडलेल्या एका जहाजाचे अवशेष सापडले असून या जहाजामध्ये पुरातन अशी मौल्यवान भांडी सापडली आहेत. ग्रीसमधील इंडिपेंडेंट पॉवर ट्रान्समिशन कंपनीचे सर्वेक्षण सुरू असताना हे जहाज संशोधकांना सापडले.
इसवीसन पूर्व 400 ते 500 या कालावधीतील हे जहाज असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या जहाजाचे अवशेष समुद्राखाली 220 मीटर खोल अंतरावर सापडले आहेत. या जहाजाच्या अवशेषांमध्ये सापडलेली पुरातन भांडी वर काढण्यात येत असून त्या भांड्यांच्या माध्यमातूनही काही महत्त्वाचे संशोधन केले जाण्याची शक्यता आहे.
या जहाजाच्या अवशेषांवर जी चिन्हे आणि खुणा आहेत त्यावरून हे जुन्या रोमन साम्राज्यातील जहाज असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी युरोपमधील लॅटिव्हिया या देशांमध्येही समुद्राखाली अशाच प्रकारचे एक जुने जहाज सापडले होते.