पुणे – शहरात पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवते. त्यामुळे बचाव कार्यासाठी अग्निशमन दलासाठी आठ बोटी खरेदी करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी या बोटी महापालिकेच्या ताफ्यात येणार आहेत.
महापालिकेकडून दोन वर्षांपूर्वी या बोटीची खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. या फायबरच्या बोट घेतल्या जाणाऱ्या होत्या. मात्र, 2022 चा पावसाळा संपल्यानंतर ही खरेदी प्रक्रिया सुरू केल्याने प्रशासनावर टीका झाली होती. त्यानंतर जवळपास वर्षभराने ही खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, “एनडीआरएफ’ वापरत असलेल्या बोट खरेदी केल्या जाणार असून मार्च- एप्रिलमध्ये त्या महापालिकेस प्राप्त होतील.
शहरात गेल्या काही वर्षांत टेकड्याच्या परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस होत आहे. परिणामी, ओढे-नाल्यांना पूर आल्यानंतर सोसायट्या तसेच घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. खडकवासला धरणातूनही अधिक विसर्ग झाल्यानंतर नदीकाठच्या भागात पाणी शिरते. या भागातील नागरिकांना वाचविण्यासाठी बोट आवश्यक असतात.
ताफ्यात नाही एकही बोट
महापालिकेच्या ताफ्यात पूर्वी दहा बोट होत्या. मात्र, 2021 च्या पावसाळ्यानंतर आर्युमान संपल्याने या सर्व बोट सेवेतून काढण्यात आल्या. त्यानंतर महापालिकेच्या ताफ्यात एकही बोट उपलब्ध नाही. त्यामुळे सुमारे 2 कोटी रुपयांची तरतूद करत या बोट खरेदीचा निर्णय घेण्यात आला.