मंचर-आंबेगाव तालुक्यातील भराडी येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 25 लाख 72 हजार 372 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघा भावांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देवराम गावडे (रा. भराडी) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंचर पोलिसांनी जितेंद्र गोरक्ष गावडे आणि अविनाश गोरक्ष गावडे (रा. भराडी) या दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे. देवराम गावडे यांनी स्वतःची शेती जितेंद्र गोरक्ष गावडे आणि अविनाश गोरक्ष गावडे यांना करण्यासाठी दिली होती.
देवराम गावडे यांच्या शेतासाठी असलेल्या ड्रिपच्या नळ्या 1 लाख 34 हजार 856 रुपयांच्या, जमीनीचे सपाटीकरण, पाइपलाइन, पीककर्ज, ट्रॅक्टर आणि कारसाठी उसणे घेतलेले आणि इतर खर्चासाठी 8 लाख 96 रुपये, उसाचे 2 लाख 37 हजार 192 रुपये, कांद्याचे 8 लाख 25 हजार रुपये, लाइटबिल 1 लाख 53 हजार 880 रुपये, पाइपलाइनच्या हिशेबात उर्वरित जमा असलेली रक्कम 79 हजार 734 रुपये, पाइपलाइन, पाइप, मोटार केबल, एक कॉक, 5 पीव्हीसी पाइप असे एकूण 3 लाख 41 हजार 614 अशी एकूण 25 लाख 72 हजार 372 रुपयांची आर्थिक फसवणूक जितेंद्र गावडे आणि अविनाश गावडे यांनी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सागर गायकवाड करीत आहेत.