पुणे – दस्त नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क कमी आकारणी करून शासनाचे तब्बल 24 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी हवेली क्रमांक 24 मधील दुय्यम निबंधक एस. पी.भातंबरेकर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी हवेली क्रमांक 24 या कार्यालयाची दि.12 ऑक्टोंबर 2023 रोजी तपासणी केली. या तपासणीमध्ये सप्टेंबर 2023 आणि ऑक्टोंबर 2023 मधील दस्तांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये दुय्यम निबंधक एस. पी.भातंबरेकर याने सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या खरेदी खताच्या दस्तामध्ये 24 कोटी 90 लाख 15 हजार 800 रुपये इतके मुद्रांक शुल्क कमी आकारल्याचे दिसून आले.
तपासणी पथकाच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी ही बाब नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना कळविली. राज्याच्या नोंदणी विभागाने भातंबरेकरांच्या निलंबनाचा प्रस्ताव 17 ऑक्टोंबर 2023 रोजी शासनास पाठविला. हवेली क्रमांक 24 चे दुय्यम निबंधक भातंबरेकरांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावे, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.