पुणे – नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने रेकॉर्डवरील सराईत तीन गुन्हेगारांना अटक करून, त्यांच्या ताब्यातून सात पिस्तुल व 24 जिवंत काडतुसे असा साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
याप्रकरणी संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (32 ,राहणार -चिखली ,पुणे), शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर (34 ,राहणार -वाशेरे ,तालुका- खेड, पुणे )आणि राहुल नर्सिंग लिंगवाले( 24, राहणार -जळगाव )या आरोपींना अटक केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस आमदार विशाल मेमाने यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की , बोपदेव घाटाच्या पायथ्याला गारवा हॉटेल जवळ दोन व्यक्ती पिस्तुल घेऊन संशयितारित्या फिरत आहेत .त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने सदर ठिकाणी संशयित आरोपींचा शोध घेऊन दोन जणांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
संदेश जाधव व शिवाजी कुडेकर या दोघांच्या ताब्यातून दोन पिस्तुल पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर पोलीस चौकशी मध्ये त्यांनी त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असून संरक्षणासाठी विनापरवाना पिस्टल जवळ बाळगले असल्याचे सांगितले. आरोपी संदेश जाधव याच्यावर यापूर्वीचे 32 गुन्हे दाखल असून त्यामध्ये खून ,घरफोडी ,दरोडेचा प्रयत्न, वाहन चोरी असे गुन्हे दाखल आहेत. तर कुडेकर याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. कुडेकर याच्या खेड येथील घराची झडती घेतली असता, पोटमाळ्यावर लपवून ठेवलेले आणखीन तीन पिस्तुल आणि नऊ काडतुसे मिळून आले आहे.
त्यामुळे कोंढवा पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केली असता, संबधित आरोपींनी महाराष्ट्र ते मध्यप्रदेश सीमेवर उमरटी , ता.वरला, जि.बडवाणी,मध्य प्रदेश या गावातील ओमकार बर्णाला याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली .त्यानुसार पोलिसांचे एक पथक ओमकार बर्णाला याला पकडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ठिकाणी गेले असता ,पोलिसांनी सापळा रचला.
त्यावेळी बर्णाला याचा साथीदार राहुल लिंगवाले याच्यामार्फत दोन पिस्तुल ,दहा काडतुसे विक्रीसाठी आणले असताना जप्त केली. सदरची कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर राजा ,एसीपी शाहूराजे साळवे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ,पोलीस निरीक्षक संदीप भोसले ,पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.