पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून, आज शहरातील बाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी भर पडली. आज दिवसभरात 1005 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून, दिवसभरात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये सर्व 1005 रुग्ण हे शहरातील आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 53 हजार 289 वर पोहोचली आहे. तर आज 24 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1117 वर पोहोचला आहे.
गुरुवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (शुक्रवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1005 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर गेल्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 18 जण शहरातील असून 6 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 909 वर पोहोचला असून शहराबाहेरील 208 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 1117 ची संख्या आज गाठली.
आतापर्यंत शहरातील 44 हजार 668 जण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 891 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2020 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 3733 जण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 6110 आणि शहराबाहेरील 863 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.