हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद येथील वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यांनी यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून जम्मू-काश्मिरात काम करण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तेथील युवकांना दहशतवादाचा मार्ग स्वीकारण्यापासून रोखावे असे आवाहन त्यांनी केले.
करोनाच्या काळात देशभरातील पोलिसांनी चांगले काम केले. या काळात त्यांचा मानवी चेहराही लोकांच्या समोर आला असे त्यांनी नमूद केले. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा यावेळी विशेष उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्या राज्यातील जनता अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्याशी आपला विशेष संबंध आहे. हे लोक पाहुण्यांना अत्यंत आदराने वागवतात. तथापि, तेथील काहींनी चुकीचा मार्ग निवडला आहे.
आपल्याला त्यांना त्यापासून रोखावे लागेल. हे काम महिला पोलीस अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतील, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला. महिला अधिकाऱ्यांनी तेथील युवकांना मातृत्वाच्या भावनेने समजावून देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा चांगला उपयोग होईल, असेही त्यांनी नमूद केले.
कामाचा ताण आणि तणाव दूर करण्यासाठी योगा आणि प्राणायाम याचाही उपयोग करून घेण्याचे आवाहन त्यांनी या अधिकाऱ्यांना केले.