पुणे – गेल्या 23 दिवसांत बुधवारी बाधितांचा उच्चांक झाला असून, 24 तासांतील बाधितांची संख्या तब्बल 1352 झाली आहे. तर 13 बाधितांचा मृत्यु झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 11 हजार 521 झाली आहे.
गेल्या 24 तासांत 646 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण बरे झालेल्या बाधितांची संख्या 1 लाख 98 हजार 892 आहे. उपचारादरम्यान 13 जणांचा मृत्यु झाला असून त्यातील सहा रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 4 हजार 910 झाली आहे.
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महीन्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण प्रत्येक दिवसाला वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असुन, सक्रीय रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. सध्या शहरात 7 हजार 719 ऍक्टीव्ह असून, त्यापैकी 364 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 721 बाधित ऑक्सिजनवर आहेत.
गेल्या चोवीस तासांत 7 हजार 721 संशयितांच्या स्वॅब टेस्ट झाल्या आहे. त्यामध्ये 1352 नवीन रुग्ण आढळले असून, चाचण्याच्या तुलनेत रुग्ण सापडण्याची टक्केवारी वाढत चालली आहे.