चंडीगढ, -पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (आप) बंडखोर आमदार सुखपालसिंग खैरा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच छापे टाकले. त्या कारवाईचा निषेध करणारा ठराव बुधवारी पंजाब विधानसभेत मंजूर करण्यात आला.
पंजाबचे मंत्री आणि कॉंग्रेस नेते ब्रह्म महिंद्रा यांनी संबंधित ठराव मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या परवानगीने मांडत असल्याचे नमूद केले. सार्वजनिक जीवनात पारदर्शकतेची निश्चिती करण्यासाठी सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांची स्थापना करण्यात आली आहे. दुर्दैवाने, त्या यंत्रणांचा वापर लोकप्रतिनिधींबरोबरच सरकारी अधिकारी, शेतकरी आणि कलाकारांचा छळ करण्यासाठी केला जात आहे. पंजाब विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ईडीच्या अनावश्यक आणि घटनाबाह्य हस्तक्षेपामुळे एका सदस्याला (खैरा) कामकाजापासून दूर राहणे भाग पडले. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अधिकारांचे उल्लंघन टाळण्याची विनंती हे सभागृह केंद्र सरकारला करते, असे महिंद्रा यांनी म्हटले.
ईडीच्या छाप्यांचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर झाल्याची घोषणा सभापती राणा के.पी.सिंग यांनी केली. ठराव मंजूर झाला त्यावेळी भाजपचे दोन्ही सदस्य विधानसभेत उपस्थित नव्हते.