-14 गावांचा समावेश
-उर्वरित गावांसाठी लवकरच निधी
पारनेर – जलजीवन मिशन योजनेंतर्गत सन 2021-22 कृती आराखड्यातील पारनेर-नगर मतदारसंघातील 14 गावांना 22 कोटी 77 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वीही मतदारसंघातील काही गावांना या योजनेंतर्गत निधी मंजूर झाला होता. आणखी काही गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, त्या गावांनाही लवकरच निधी उपलब्ध होईल, असे आ. लंके यांनी सांगितले.
विविध गावांच्या योजनांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे : सांगवी सूर्या (1 कोटी 54 लाख 67 हजार), घाणेगाव (63 लाख 58 हजार), हंगे (1 कोटी 89 लाख 80 हजार), ढोकी (1 कोटी 99 लाख 76 हजार), गुणोरे (1 कोटी 95 लाख 55 हजार), गटेवाडी (80 लाख 42 हजार), शेरीकासारे (1 कोटी 47 लाख 91 हजार), रेनवडी (1 कोटी 20 लाख 77 हजार), तिखोल (1 कोटी 99 लाख 36 हजार), पिंपळनेर (1 कोटी 99 लाख 51 हजार), जातेगाव (1 कोटी 94 लाख 64 हजार), म्हसे खुर्द (1 कोटी 70 लाख 42 हजार), चास (1 कोटी 99 लाख 80 हजार), निंबळक (1 कोटी 61 लाख 42 हजार) निधी मंजूर झाला आहे.
आ. लंके यांनी सांगितले की, विविध गावांमध्ये पाणी योजनांची दुरवस्था झाल्याने तेथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याच्या तक्रारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात येत होत्या. त्याच वेळी आपण महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर सर्वेक्षण करण्यात येऊन ज्या गावांना पाणीयोजनांची आवश्यकता आहे, त्या गावांच्या योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात येऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर या योजनांचे पाणीपुरवठा विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन विविध गावांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीही काही गावांना या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, आणखी काही गावांच्या योजनांना तिसऱ्या टप्प्यात निधी उपलब्ध होणार आहे.
लवकरच पारनेरचा पाणीप्रश्नही मार्गी
– पारनेर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचाही आपण शब्द दिला होता. या योजनेचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर देण्यात आला असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी योजनेलाही मंजुरी मिळून पारनेरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही आ. लंके यांनी सांगितले.