जामखेड – हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांना जामखेड तालुक्यातील मोहरी या ठिकाणी पहाटे मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच महाराजांकडील असलेले 13 लाख 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, बीडच्या पाटोदे तालुक्यातील सावरगाव येथील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज हे दि.29 रोजी तालुक्यातील मोहरी येथील घुगेवस्ती येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी आले होते. त्याच दिवशी मोहरी येथील बाजीराव गिते यांच्या घरामध्ये पहाटे दीड ते साडेपाच या वेळेत त्यांना मारहाण करण्यात आली.
याबाबत खर्डा पोलिस ठाण्यात खाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी घुगेवस्ती, मोहरी येथे गेले असता तेथे बाजीराव गिते, भिवा गोपाळघरे, अरुण गिते, राहुल संपत गिते, रामा गिते यांनीघरामध्ये बोलावून घेऊन आरोपी राहुल संपत गिते याने मोबाईलमधील फोटो दाखवून शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीच्या दोन्ही कानशिलात लगावली. त्यावेळी खाडे महाराज हे खाली पडले असता इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या वेळी राहुल संपत गिते याने हातामध्ये सुताची दोरी घेऊन महाराजांच्या तोंडाभोवती फिरवून, तुला फाशी देईल अशी धमकी दिली आहे.
त्यानंतर पहाटे 5.30 वा. राहुल गिते हा हातामध्ये कोयता घेऊन व बाजीराव गिते हा लोखंडे पेरे घेऊन तुझ्या अंगावरील सोने काढून दे, नाहीतर तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करून टाकू, अशी धमकी देत खाडे महाराजांच्या 13 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतल्या.
बुवासाहेब खाडे महाराज जखमी असल्याने त्यांच्यावर नगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून जखमी बुवासाहेब खाडे महाराज यांचा जबाब प्राप्त झाल्यानंतर दि. 3 रोजी रात्री उशिरा खर्डा पोलिस ठाण्यात मोहरी गावातील पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.
खाडे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा
– मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याने त्यांच्यावर जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील महिलेने खर्डा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल दिली. हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे याने सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे खर्डा पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत. या घटनेत दोन्ही बाजूने परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.