जुन्नर -जुन्नर शहरात बुधवारी (दि. 15) 4 तर तालुक्यात 17 असे एकूण 21 बाधित रुग्ण दिवसभरात आढळले आहेत. जुन्नर शहरातील बधितांची संख्या 13 वर पोहोचली आहे. त्यापैकी 11 जणांवर उपचार सुरू आहेत. तर दोघांनी करोनावार मात केली आहे.
दरम्यान शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाले असून पुढील गुरुवार (दि. 23) पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसाय बंद राहणार असल्याचे नगरपालिकेने जाहीर केले आहे. त्याला व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून गेले दोन दिवस सर्व बाजारपेठा कडेकोट बंद आहेत. दरम्यान, तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील एका युवकाचा करोनाने बळी घेतला आहे. हा तालुक्यातील चौथा मृत्यू ठरला आहे.
बुधवारी (दि. 15) तालुक्यात 16 व्यक्ती करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्याची संख्या 185वर पोहोचली असून 102 जणांवर उपचार सुरू असून 79 जणांनी करोनावर मात करीत घरी परतले आहेत. दरम्यान, आतापर्यंत लेण्याद्री येथील केंद्रात तब्बल 1682 रुग्णांची स्वॅब चाचणी घेण्यात आली असून बुधवारी 117 संशयितांची चाचणी घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.