न्यूयॉर्क : जगात कोरोनाचा कहर वाढतच आहे. त्यातच जगभरात कोरोनाचे 53 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 107,706 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 5,245 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोनाची लागण 5,303,715 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 39 हजार 418 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 21 लाख 56 हजार 288 रुग्ण बरे झाले आहेत.
जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 40 लाखांच्या घरात आहे. वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 124,794 रुग्ण आहेत. तर 3,726 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 69,244 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 51,824 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,645,084 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 97,640 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 36,393 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 254,195 इतकी आहे.
स्पेनमध्ये कोविड-19मुळं 28,628 लोकांचा मृत्यू झालाय. 281,904 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,616 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 228,658 इतका आहे.