गुजरात एटीएसची कारवाई
पुणे -अहमदाबादमधील कालुपुरा रेल्वेस्थानक परिसरात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी मोहसीन पूनावाला याला गुजरात राज्य दहशतदवादी विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातून अटक केली. त्याला गुजरातला नेण्यात आले आहे.
“या कारवाईसाठी गुजरात एटीएसने पुणे पोलिसांकडे मदत मागितली होती. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती परिमंडळ-5 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
कालुपुरा बॉम्बस्फोट प्रकरणात गेले 14 वर्षे पसार असलेल्या अब्दुल रज्जाक गाजी याला ऑगस्ट 2020 मध्ये गुजरात एटीएसने बांगलादेश सीमेवरून अटक केली होती. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत पूनावालाची माहिती मिळाली होती.
पूनावाला पसार झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून वानवडी भागात राहात असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. याबाबतची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आल्यानंतर एटीएसच्या पथकाने पूनावालाला अटक केली.
गाजीने लष्कर-ए-तोएबाचे हस्तक जुल्फिकार कागजी आणि अब जुंदाल यांना आश्रय दिला होता. फेब्रुवारी 2006 मध्ये कालपूर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर बॉम्ब ठेवला होता. स्फोटात प्रवासी जखमी झाले होते. मात्र, या घटनेत कोणीही मृत्युमुखी पडले नव्हते.