लिलॉंग्वे – आफ्रिकेतील मलावी या देशाने तब्बल 19 हजार 610 कोरोना लसी जाळून नष्ट केल्या आहेत. या देशाच्या आरोग्य मंत्रालयानेच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. या सर्व लस ऍस्ट्राझेनेका कंपनीच्या होत्या. आपल्याला दिल्या जाणाऱ्या लसी सुरक्षित आहेत, याची लोकांना खात्री पटावी यासाठी ही कृती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जगभरात सगळीकडेच अर्थात श्रीमंत देश वगळून अन्यत्र लसींचा तुटवडा असताना आणि गरीब देशांना लसींसाठी धडपड करावी लागत असताना ही बातमी आल्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. मलावीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नष्ट करण्यात आलेल्या सर्व 19 हजार 610 लस या मुदत संपलेल्या म्हणजे संपलेल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेने सुरुवातीला या देशांनी या मुदत संपलेल्या कोरोना लसी नष्ट करु नये असा सल्ला दिला होता. मात्र, आता त्यांनी देखील आपल्या सल्ल्यात बदल केला आहे.
मलावीमध्ये करोना लसीबाबतच्या अनेक शंकाकुशंकांमुळे लसीकरण करुन घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. मुदतबाह्य लसी नष्ट केल्याने आता लसीकरण करुन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल, असे त्यांना आता वाटते आहे. 1 कोटी 80 लाख लोकसंख्या असलेल्या मलावी देशात आतापर्यंत 34 हजार 232 करोना रुग्णांची नोंद झालीय. त्यापैकी 1153 जणांचा मृत्यू झाला आहे.
मलावीला 26 मार्च रोजी आफ्रिकन संघाकडून 1 लाख 2 हजार करोना लस मिळाल्या. यापैकी जवळपास 80 टक्के लसींचा वापर झाला. मात्र, उर्वरित लसींची वापराची मर्यादा संपली. या लसींची एक्स्पायरी डेट 13 एप्रिल होती.