लंडन – ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी समुद्रकिनाऱ्याजवळ एका व्यवसायिक नौकेवर छापा घालून तब्बल 2 टन कोकेन जप्त केले आहे. ब्रिटनच्या नॅशनल क्राइम एजन्सीने ही माहिती दिली. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 160 दशलक्ष पौंड (221 दशलक्ष डॉलर) एवढी आहे.
ही नौका कॅरेबियन देशांमधून आली होती आणि या नौकेवर जमैकाचा ध्वज होता. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे, यामध्ये एक ब्रिटीश व्यक्ती असून इतर सहा जण निकारगुआचे नागरिक आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काहू बंदरामध्ये ही नौका आल्यानंतर या नौकेवर छापा घालण्यात आला होता. पोर्ट ऑफ प्लायमॉथच्या किनाऱ्यापासून 80 मैल दूर असताना नॅशनल क्राइम एजन्सीने या बोटीवर छापा घातला. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे मिळवलेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये ऑस्ट्रेलियाचे पोलिसदेखील सहभागी झाले होते. हे कोकेन संपूर्ण ब्रिटनमध्ये वितरीत करण्यात येणार होते, यात काहीही शंका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामूहिकपणे चालवण्यात येणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश यामुळे करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.