मोन्टेविडीओ, (उरुग्वे) – उरुग्वेच्या पूर्व किनाऱ्यावर गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 2 हजार पेंग्विन पक्षी मृतावस्थेमध्ये आढळले आहेत. या पेंग्विन पक्षांच्या मृत्यूमागे एवियन इंफ्लुएन्झाचे कारण असल्यासारखे वाटत नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मॅगेलेनिक पेंग्विन हे सर्वात दुर्मिळ प्रजाती समजली जाते आहे.
या पेंग्विन पक्षांचा मृत्यू अटलांटिक समुद्रामध्ये झाला असावा आणि ते प्रवाहाबरोबर वहात येऊन किनाऱ्यावर पडले असावेत, असा अंदाज पर्यावरण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. या पेंग्विनपैकी 90 टक्के पेंग्विन युवावस्थेतील होते. तसेच त्यांची उपासमार झाल्याची चिन्हे आढळत होती. या पक्षांच्या मृतदेहांची तपासणी करण्यात आली असून एव्हियन इंफ्लुएंझाच्या तपासणीसाठी नुमने गोळा करण्यात आले आहेत.
हे पेंग्विन दक्षिण अजेंटिनामध्ये सापडतात. अन्नाच्या शोधासाठी आणि उष्ण पाण्याच्या प्रवाहांच्या शोधासाठी ते दक्षिणेकडे प्रवास करत असतात. ब्राझीलच्या एस्पिरिटो सॅन्टो या किनाऱ्यापर्यंत त्यांचा प्रवास होत असतो. या प्रवासात अनेक पेंग्विन मृत्यू पावतात.
अटलांटिक किनाऱ्याच्या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये 500 पेंग्विन यापूर्वी मृतावस्थेमध्ये आढळून आले होते. मात्र इतक्या मोठ्या संख्येने पेंग्विन मरण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या पेंग्विनची उपासमार होण्यामागे बेकायदेशीर होणारी वारेमाप मासेमारी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते आहे.