नवी दिल्ली – पाकिस्तानमधील कट्टर इस्लामी व्याख्याता अंजेम चौधरी याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. अंजेम चौधरीकडे पाक आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. काही वर्षांपूर्वीच त्याला तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. दहशतवादाशी संबंधित 3 आरोप ठेवल्यामुळे त्याला अटक करून लंडनमधील न्यायालयामध्ये सोमवारी हजर करण्यात आले. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे, दहशतवादी संघटनांच्या पाठिंब्यासाठी भाषणे देणे आणि दहशतवादी संघटनांना मार्गदर्शन करण्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.
अन्य संघटनांबरोबर अल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी तो संबंधित आहे.
2016 मध्ये त्याला दहशतवादी कृत्यांच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले होते. मुस्लिमांनी इसिसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्याने आपल्या भाषणातून केले होते. 2018 मध्ये त्याची सुटका केली गेली होती.
चौधरीच्या समवेत कॅनडाचा नागरिक असलेल्या खालेद हुसैन याला देखील दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तो लंडनमध्ये आल्यावर विमानतळावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सविस्तर चौकशीसाठी त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.