पुणे – ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहक सेवा देताना महावितरणच्या पुणे परिमंडलाने गेल्या वर्षभरात विक्रमी २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. नवीन वीजजोडणी देण्याचा दरमहा सरासरी वेग आता १९ हजार ९०० वर गेला आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
राज्य शासनाने ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार ग्राहकसेवा गतीमान करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पुणे परिमंडल अंतर्गत नवीन वीजजोडण्या व आवश्यकतेनुसार वीजमीटरचा पुरवठा व्हावा यासाठी दर आठवड्यात मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया आणखी गतीमान झाली आहे
पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्यांना मोठा वेग दिल्याने डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत वर्षभरात तब्बल २ लाख ३३ हजार ६०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. तर चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंतच्या आठ महिन्यांमध्ये सर्व वर्गवारीच्या तब्बल १ लाख ५९ हजार २०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. त्यात घरगुती- १ लाख ९७ हजार १८०, वाणिज्यिक- २६ हजार ७३९, औद्योगिक- ३८२१, कृषी- २८२९ व इतर ३०४० वीजजोडण्यांचा समावेश आहे.
पुणे परिमंडलामध्ये मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. वीजमीटरबाबत किंवा नवीन वीजजोडणी संदर्भात काही तक्रार असल्यास ग्राहकांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी थेट संपर्क साधावा. वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“पुणे परिमंडलात नवीन वीजजोडण्यांचा वेग आणखी वाढविण्यात आला आहे. त्यासाठी परिमंडलस्तरावर दर सोमवारी व गुरुवारी विभाग कार्यालयनिहाय आढावा घेण्यात येत आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे नवीन वीजजोडण्या देण्याचा दरमहा वेग एक वर्षापूर्वी १५ हजार ते १६ हजार होता तो आता दरमहा १९ हजार ९०० वर गेला आहे.” – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता,