नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले असले तरी त्यांच्यात कोणतीही फूट नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या दोन्ही गटांचे विधिमंडळ कार्यालय एकच असेल, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केला आहे.
पण दुसरीकडे, शरद पवार गटाने या कार्यालयावर आपलाच दावा असल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या दोन्ही गटांत पक्ष कार्यालयावरून चांगलेच आकांडतांडव माजण्याची शक्यता आहे.
नागपुरात होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादळी ठरते. कधी राजकीय आरोप, प्रत्यारोपांमुळे तर कधी पक्षातील फूट यासाठी कारणीभूत ठरते. येत्या ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये अधिवेशनाला सुरूवात होत आहे.
मागच्या अधिवेशनावेळी शिवसेनेत फूट पडली होती. तेव्हा विधिमंडळ परिसरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला होता. मात्र निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण दिल्यामुळे आता हे पक्ष कार्यालय शिंदे गटाला मिळाले आहे. तर ठाकरे गटाला राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाजूला जागा देण्यात आली आहे.
दोन्ही गट एकाच कार्यालयातून काम करतील -मिटकरी
अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी आपल्या पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे एकच विधिमंडळ कार्यालय असेल.
अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयातूनच आमचे काम चालेल. दुसऱ्या गटालाही याच कार्यालयातून काम करावे लागेल, असे मिटकरी यांनी या प्रकरणी सांगितले आहे.
देशमुखांनी फेटाळला मिटकरींचा दावा
दुसरीकडे, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी अमोल मिटकरींचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच विधिमंडळ परिसरातील पक्ष कार्यालयावर आपल्याच गटाचा दावा असल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमचा गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
त्यामुळे कार्यालयावर आमचाच हक्क आहे. मुंबईतही आमच्या गटाला ठरलेले कार्यालय मिळाले. अजित पवार गटाला दुसरी जागा देण्यात आली. त्यानुसार हिवाळी अधिवेशनातही आम्हालाच कार्यालय मिळेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.