पुणे – अत्यावश्यक सेवेसाठी व कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक शाखेने शहरातील 180 रिक्षाचालकांना परवानगी दिली आहे. वाहतूक शाखा व सिटीग्लाइडतर्फे ही एक प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
लॉकडाउनमुळे नागरिकांना खासगी वाहने वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा किंवा कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी रिक्षा उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार, वाहतूक शाखेने सिटीग्लाइड यांच्या सहयोगाने 180 रिक्षाचालकांना एका प्रवाशाची वाहतूक करण्यास दि.24 मार्च रोजी परवानगी दिली. तेव्हापासून 8 हजार 132 जणांनी या सेवेसाठी संपर्क केला. त्यापैकी 866 जणांनी प्रत्यक्षात रिक्षा सेवेचा फायदा घेतल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
अशी मिळेल तुम्हाला रिक्षा सेवा
या रिक्षा सेवेसाठी 985-919-8591 या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित क्रमांकावर प्रवास कोणत्या कारणासाठी करायचा आहे, याची विचारणा होईल. अत्यावश्यक काम असल्यास ही सेवा मिळणार आहे.
रिक्षा सेवेमध्ये अशी घेतली जातेय काळजी
– सर्व रिक्षाचालक 45 वयोगटाखालील
– रिक्षा असेल सॅनिटाइज
– प्रवासावेळी चालक/प्रवासी यांना मास्क वापरणे बंधनकारक
– चालकांना सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक